रत्नागिरी मजगावमधील आदिल इबजींची ब्रिटनमधील हेरियट-वॉट विद्यापीठातून एमएससी पदवी

Gramin Varta
347 Views

रत्नागिरी : तालुक्यातील मजगाव येथील आदिल अब्दुल मजीद इबजी यांनी ब्रिटनमधील प्रतिष्ठित हेरियट-वॉट विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स इन इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट विथ फायनान्स ही पदव्युत्तर पदवी संपादन करत कोकणच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

विद्यापीठाच्या सिनेटच्या ठरावानुसार ५ जुलै २०२६ रोजी त्यांना ही पदवी अधिकृतपणे प्रदान करण्यात आली. जवळपास दोनशे वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या विद्यापीठाला व्यवसाय, वित्त, अभियांत्रिकी आणि डेटा सायन्स या क्षेत्रात जागतिक स्तरावर विशेष मान्यता आहे. जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत.

आदिल यांनी पूर्ण केलेला इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट विथ फायनान्स हा अभ्यासक्रम जागतिक व्यापार, वित्तीय व्यवस्थापन, आर्थिक विश्लेषण, गुंतवणूक आणि बहुसांस्कृतिक नेतृत्व कौशल्यांवर आधारित आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जागतिक स्तरावरील विविध करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

आदिल यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कतार येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी स्कॉटलंडमधील हेरियट-वॉट विद्यापीठात प्रवेश मिळवला. शिक्षणातील सातत्य, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी ही प्रतिष्ठेची पदवी संपादन केली.

आपल्या यशाबद्दल बोलताना आदिल म्हणाले, “सामान्य कुटुंबातून येऊन अशा जागतिक दर्जाच्या विद्यापीठात शिक्षण घेणे हे मोठे आव्हान होते. मात्र पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे ते शक्य झाले. परदेशात शिक्षण घेताना विविध देशांतील विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक अनुभवही मिळाला. कोकणातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.”

त्यांच्या या यशाबद्दल वडील अब्दुल मजीद इबजी आणि आई कैरसबेगम यांनी आनंद व्यक्त करत मुलाने कुटुंबासह मजगाव आणि रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केल्याचे सांगितले.

शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, आदिल यांच्या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची नवी प्रेरणा मिळणार आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर बँकिंग, फायनान्शियल कन्सल्टिंग, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात त्यांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध असून ते लवकरच एका बहुराष्ट्रीय कंपनीत रुजू होण्याच्या तयारीत आहेत.

आदिल इबजी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरीसह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :
4820792
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *