रत्नागिरी रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण: न्यातीच्या कामांवर प्रश्नचिन्ह

Gramin Varta
352 Views

बांधकाम विभागाच्या देखरेखीवरही उपस्थित होताहेत प्रश्न

रत्नागिरी : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील छताचा काही भाग सोमवारी कोसळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, उद्घाटनापूर्वीही याच ठिकाणी छताचा भाग कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच कंत्राटदार न्याती कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या कामासाठी केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात आले. मात्र, एवढ्या मोठ्या निधीची कामे सुरू असताना त्यांच्या दर्जाची योग्य तपासणी झाली का, संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची प्रभावी पाहणी केली का आणि निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

९ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या स्थानकाच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण झाले होते. त्यापूर्वी २६ ऑगस्ट २०२४ रोजी सिंधुदुर्गातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातही कामाच्या गुणवत्तेवर आणि संबंधित यंत्रणांवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकातील या घटनेचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दिवसभर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. सुदैवाने छत कोसळले तेव्हा त्या ठिकाणी मोठी गर्दी नसल्याने संभाव्य जीवितहानी टळली. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण कामाचे तांत्रिक परीक्षण करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

Total Visitors :
4827441
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *