रत्नागिरी : स्थानिक तांदुळच धान्य दुकानांवरून वितरित करा – बाळ माने

Gramin Varta
235 Views

मिऱ्या येथे केली भातरोप लावणी

रत्नागिरी : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या तांदळाचेच सार्वजनिक वितरण प्रणालीत (रेशन) वितरण व्हावे, यासाठी जिल्ह्यात राइस मिल उभारण्यात याव्यात, अशी मागणी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी राज्य शासनाकडे केली.

मिऱ्या येथे रविवारी कुटुंबासमवेत भातरोप लावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना माने बोलत होते. यंदा पावसाला उशीर झाल्याने भातशेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी पेरण्या झाल्यानंतरही पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना विहिरीतील पाण्यावर शेती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचीही त्यांनी व्यक्त केली. रेशनवर सध्या इतर राज्यांतील तांदुळ वितरित केला जातो. मात्र कोकणातील, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील तांदुळ स्थानिक नागरिकांना रेशनवर उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने जिल्ह्यात राइस मिल उभाराव्यात. शेतकऱ्यांनी अतिरिक्त उत्पादन शासनाच्या धान खरेदी योजनेत विकल्यास त्यांना चांगला दर मिळेल आणि त्याच तांदळाचा लाभ स्थानिक नागरिकांनाही होईल, असे माने यांनी सांगितले.

शेतीकडे लोकांचा कल वाढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळण्यासाठी भातशेतीचे क्षेत्र वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक कारणांमुळे गावागावांत शेती पडीक राहू लागली आहे. मात्र शेतकरी हा समाजाचा आधारस्तंभ असून कुटुंबाने एकत्र येऊन शेती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र किमान एक लाख हेक्टरपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही ते म्हणाले.

यावेळी कमलाश्रम येथील निवासस्थानालगतच्या शेतात माने कुटुंबीयांनी सामूहिक भातरोप लावणी केली. पुढील आठवड्यात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मिऱ्या गावातून यंदा प्रथमच सडामिऱ्या व जाकीमिऱ्या येथून रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत दोन तासांची पायी वारी काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यंदाचे भात उत्पादन चांगले व्हावे आणि शेतकरी सुखी-समृद्ध व्हावा, अशी प्रार्थना विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी केल्याचे त्यांनी सांगितले. आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देतानाच वीजबिलाच्या थकबाकीबाबतही शासनाने निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बाळ माने यांनी आभार मानले.

Total Visitors :
4576143
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *