रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात मोठी चालना देणारा निर्णय घेण्यात आला असून १०० जागांच्या बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला ८ जुलै २०२६ रोजी मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या परिचारिकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात रोजगाराच्या संधीही मिळणार आहेत. याशिवाय ३० खाटांच्या एकात्मिक आयुष रुग्णालयालाही मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट होणार आहेत.ही माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हेही उपस्थित होते.
रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हे चौथे वर्ष असून कंत्राटी पद्धतीने सुमारे ४५० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या महाविद्यालयाने उल्लेखनीय प्रगती केली असून जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेतही मोठी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.
पूर्वी जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे २०० रुग्णांची नोंद होत होती. आता ही संख्या ५५० पर्यंत पोहोचली आहे. पावसाळ्याच्या काळात दररोज ११०० ते १२०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. रुग्णालयात आतापर्यंत ११,१७७ विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यापैकी २५० गंभीर शस्त्रक्रियांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा शासकीय आरोग्य सेवेवरील विश्वास वाढत असल्याचेही सांगण्यात आले.
रुग्णालयातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी हिमोफिलिया उपचार केंद्रासाठी ५० लाख रुपये, अस्थिरोग विभागासाठी २० लाख रुपये तसेच ऑक्सिजनसह अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
महिलांच्या वॉर्डमध्ये पुरुषांचा अनावश्यक वावर रोखण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ही नियमावली तयार झाल्यानंतर तिची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असून आरोग्य संस्थांमध्येही आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
बीएससी नर्सिंग महाविद्यालयासाठी सुमारे ६६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.





