जन्मदात्री आईच शत्रू वाटली; कौटुंबिक वादातून मुलाने गळा आवळून केली आईची निर्घृण हत्या!

Gramin Varta
310 Views

नवी मुंबई : आई आपल्या बहिणीच्या संसारात अधिक लक्ष देते, पत्नीपासून दूर राहण्यावरूनही वारंवार वाद होतात, या कौटुंबिक कारणातून निर्माण झालेल्या संतापाचा उद्रेक झाल्याने मुलानेच आपल्या ६३ वर्षीय आईची निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना नवी मुंबईतील जुहूगाव परिसरात उघडकीस आली आहे. रविवारी रात्री झालेल्या कौटुंबिक वादातून मुलाने आईचा गळा आवळून तिचे डोके फरशीवर आपटल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी वाशी पोलिसांनी आरोपी मुलगा महेश रत्नाकर कदम (४३) याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुहूगाव परिसरात मंदा रत्नाकर कदम या आपल्या मुलगा महेशसोबत राहत होत्या. गेल्या काही काळापासून आई आणि मुलामध्ये कौटुंबिक कारणांवरून सातत्याने वाद होत होते. महेशच्या मते, त्याची आई घरातील मुलगा आणि सुनेकडे पुरेसे लक्ष न देता मुलगी आणि जावयाच्या संसारात अधिक लक्ष देत होती. याच कारणामुळे त्याच्या मनात आईविषयी नाराजी आणि राग वाढत गेला होता.

याशिवाय महेशची पत्नी सध्या अंबरनाथ येथे स्वतंत्रपणे राहत असल्याने ती आईपासून आणि पतीपासून दूर का राहते, यावरूनही आई-मुलामध्ये वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. सततच्या कौटुंबिक वादामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

रविवारी रात्री याच विषयावरून महेश आणि त्याची आई मंदा कदम यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात महेशने आईचा गळा आवळला आणि तिचे डोके फरशीवर आपटले. गंभीर दुखापतीमुळे मंदा कदम यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर मृत महिलेच्या जावयाने दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात महेश कदम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महेश कदम याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या धक्कादायक हत्येचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4684842
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *