दापोलीचे सुनिल शिंदे यांचा आग्रा ते राजगड १४०० किमी सायकल प्रवास पूर्ण

Gramin Varta
39 Views

दापोली: छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी औरंगजेबच्या कैदीतून बुद्धीचातुर्याने केलेल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या शिवचातुर्य दिनानिमित्त गरुडझेप संस्था पुणे तर्फे १७ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आग्रा ते राजगड सायकल मोहीम आयोजित केली होती. यामध्ये सहभागी होत दापोली सायकलिंग क्लबचे सुनिल शिंदे, वय ५६ यांनी आग्रा किल्ला ते राजगड किल्ला असा तब्बल १४००+ किमीचा सायकलप्रवास ११ दिवसात यशस्वीपणे पूर्ण केला.

गरुडझेप मोहिमेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री आबा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिरीष लोणकर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत महाराष्ट्रातून ५० सायकलपट्टू सहभागी झाले होते. यामध्ये सोबत शिवज्योत घेऊन धावणारे शिवभक्त तसेच मर्दानी खेळ सादर करणारे वीरही होते. उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या चार राज्यातून जाणाऱ्या या ऐतिहासिक मोहिमेचा मार्ग आग्रा, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, पाचोर, देवास, ठिकरी, नरडाणा, चांदवड, संगमनेर, पुणे, राजगड असा होता. आग्राच्या उष्णतेपासून ते वाटेतील चढउतार ऊनवारा व पावसापर्यंत विविध आव्हानांना सामोरे जात हा सायकल प्रवास जिद्दीने पूर्ण झाला.

याबद्दल अधिक माहिती देताना सुनिल शिंदे यांनी सांगितले की, मी पहिल्यांदाच अशा मोठ्या लांब अंतराच्या ऐतिहासिक सायकल मोहिमेत सहभागी झालो होतो. सोबत चिपळूण सायकलिंग क्लबचे प्रशांत दाभोळकर, हेमंत भोसले, ज्योती परांजपे, डॉ अश्विनी गणपते, रमा करमरकर, अमित कवितके रत्नागिरी असे रत्नागिरी जिल्ह्यातील सात मावळे सहभागी झाले होते. आम्ही दररोज १०० ते १५० किमी सायकल चालवली. अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना शिवचातुर्य दिन आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी, आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव होता. ही ऐतिहासिक सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.

Total Visitors :
4773038
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *