देवरुख: जागतिक योग दिनानिमित्ताने श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे शनिवारी २१ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता मोहिमेचा समावेश आहे.
देवरुख पोलीस ठाणे, राजू काकडे हेल्प ॲकॅडमी, संगमेश्वर तालुक्यातील पोलीस पाटील, तसेच आपलं देवरूख, सुंदर देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम होणार आहेत. सकाळी ७.३० वाजता श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे पायथ्यापासुन स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
जागतिक योग दिनानिमित्त योगाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मार्लेश्वर परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. राजू काकडे हेल्प ॲकॅडमीतर्फे आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत काही प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. सहभागी सर्वांसाठी सकाळी अल्पोपाहार, दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी युयुत्सु आर्ते व सागर मुरूडकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Category: बातम्या
-

श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे आज स्वच्छता मोहीम
-

मोदी सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांच्या निमित्ताने रत्नागिरीत भव्य मार्गदर्शन कार्यक्रम
रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने मोदी सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांच्या पूर्णत्वानिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत देशभरात राबविण्यात आलेली विविध विकासकामे, लोककल्याणकारी योजना, सुशासन व प्रशासनातील क्रांतिकारी बदल याबद्दल या कार्यक्रमात माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी केले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राजेश आयरे यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली. त्यात प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, जल जीवन मिशन, वंदे भारत एक्स्प्रेस यांसारख्या योजनांची माहिती देत या योजनांनी भारतात कसा सकारात्मक बदल घडवला, हे उलगडून सांगितले.
मोदी सरकारच्या विकासाच्या संकल्पनेची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे व देशहितासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा आढावा घेणे हे कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
कार्यक्रमाला भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप सुर्वे, नीलेश आखाडे, अमित विलणकर, नितीन जाधव, गुरुप्रसाद फाटक, तुषार देसाई, सचिन गांधी, बबलू विलणकर, वैभवी शिवलकर, मुकुंद विलणकर, समीर वस्ता, प्रणाली रायकर, शैलू बेर्डे, प्रवीण रायकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, सानिका शर्मा, अमेय घुडे, कमलाकर जोशी यांच्यासह अनेक महिला व युवक कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. -

जाकादेवी येथे दुचाकीस्वाराची पादचाऱ्याला धडक, वृद्ध गंभीर
ट्रिपल सीट दुचाकीस्वारावर गुन्हा
रत्नागिरी : निवळी-गणपतीपुळे रस्त्यावर जाकादेवी बाजारपेठेत बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. तिघांना घेऊन वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलने पादचाऱ्याला धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल राजेंद्र जाधव (वय १९, रा. ओरी, बौद्धवाडी, ता.जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात निवळी ते गणपतीपुळे जाणाऱ्या रोडवर जाकादेवी बाजारपेठेतील श्री. काणे यांच्या ‘स्वरूप हार्डवेअर’ दुकानातून बाहेर पडताना घडला. या अपघातात रघुनाथ पांडुरंग खापले हे पादचारी गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादी विष्णू हरी घाणेकर (वय ४०, चंदा रिक्षा चालक, रा. देवूड, लावगणवाडी, ता.जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल राजेंद्र जाधव (वय १९, रा. ओरी, बौद्धवाडी, रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील (एम.एच.०८/बी.एच/४८४७) या क्रमांकाच्या मोटारसायकलवर रोशन विनोद मोहिते (रा. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि जिया जितेंद्र मोहिते (रा. वरवडे, ता.जि. रत्नागिरी) यांना ट्रिपल सीट बसवून जाकादेवी बाजारपेठेतून गणपतीपुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता.
मोटारसायकल चालवताना आरोपी कुणाल जाधवने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता, अतिवेगाने गाडी चालवून ती रस्त्याच्या उजव्या बाजूला नेली. याचवेळी रस्त्यावर असलेल्या पादचारी रघुनाथ पांडुरंग खापले यांना त्याने धडक दिली. या अपघातात खापले यांच्या डोक्याला आणि डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या डाव्या हाताला, पायाला आणि गालाला किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
अपघात घडल्यानंतर तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली. बुधवार, १९ जून रोजी रात्री पावणेअकरा वाजता कुणाल जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. -

देवरुख : आंबा घाटात एसटी बसची डंपरला धडक, वाहनांचे नुकसान
देवरुख : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटातील दख्खीण बौद्धवाडी येथे आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका एसटी बसने उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, एसटी चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनू हल्लुलाल वर्मन (१९, सध्या रा. देवळे कॅम्प, ता. संगमेश्वर, मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी अझरुद्दीन मेहबूब शेख (वय ३९, व्यवसाय नोकरी, रा. आझाद गल्ली, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हा त्याच्या ताब्यातील एम.एच-१४.बी.टी २७२२ या क्रमांकाची एसटी बस घेऊन जात होता.
आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील दख्खीण बौद्धवाडी येथे रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता, एसटी बस चालकाने अत्यंत धोकादायक आणि निष्काळजीपणे बस चालवली. यामुळे त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एम.एच १० डी.टी ७९९१ या क्रमांकाच्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे अपघात होऊन दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी, सोनू हल्लुलाल वर्मन यांच्या तक्रारीनुसार, देवरुख पोलीस ठाण्यात १९ जून रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. -

रत्नागिरीत तरुणाला ५.३३ लाखांचा ऑनलाइन गंडा
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची ५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेलिग्राम ॲपवरून ‘जी श्री कृष्णा’ नावाच्या प्रोफाइल असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील आंबेडकर रोड, धनजीनाका येथील रहिवासी माझ एजाज सुभेदार ( २८, व्यवसाय नोकरी) हे दि. १४/०६/२०२५ ते दि. १७/०६/२०२५ या कालावधीत टेलिग्राम ॲपवर ‘जी श्री कृष्णा’ नावाच्या अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात आले. या आरोपीने सुभेदार यांना ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळेत अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादी सुभेदार यांनी गुंतवलेली लहान रक्कम आरोपीने नफ्यासह परत केली, ज्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला.
या विश्वासानंतर आरोपीने दिलेल्या यूपीआय आयडी आणि बँक खात्यांवर फिर्यादी सुभेदार यांनी त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यातून १ लाख ७५ हजार रुपये तर त्यांचा मित्र अजमल साजीद सोलकर यांच्या बँक खात्यातून ३ लाख ५८ हजार रुपये असे एकूण ५ लाख ३३ हजार रुपये जमा केले. मात्र, यानंतर जेव्हा फिर्यादीने आपली गुंतवलेली आणि नफ्याची रक्कम परत मागितली, तेव्हा आरोपीने रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली आणि त्यांची फसवणूक केल्याचे सभेदार यांच्या निदर्शनास आले.
घडलेल्या प्रकारानंतर माझ सभेदार यांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी ‘जी श्री कृष्णा’ नावाच्या टेलिग्राम प्रोफाइलचा वापर करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. -

जन्मठेपेची शिक्षा भोगत पॅरोलवर सुटलेल्या फरार कैद्याला नवी मुंबईतून अटक ; रत्नागिरी LCB ची कारवाई
गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा
रत्नागिरी: खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर (पॅरोल) पळून गेलेल्या एका कैद्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नवी मुंबईतून मोठ्या शिताफीने अटक केली. गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या फरार कैद्याच्या अटकेमुळे रत्नागिरी पोलिसांच्या शोध मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्यातून संचित रजा घेऊन फरार झालेले कैदी आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (वय ३३, रा. गोवा, मूळ रा. विजापूर, कर्नाटक) हा २०११ मधील एका खुनाच्या गुन्ह्यात दोषी असून, गोव्यातील मध्यवर्ती कारागृह, कोलवाड येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याला गोवा कारागृह प्रशासनाने ११ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ३० दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली होती. या कालावधीत त्याने रत्नागिरीत राहणे अपेक्षित होते. पॅरोलची मुदत संपल्यानंतर ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्याला कारागृहात हजर राहणे बंधनकारक होते, मात्र तो हजर झाला नाही.
या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २६२ अन्वये गुन्हा (गुन्हा रजि. क्र. ३७४/२०२४) दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून चन्नाप्पा गंगवार पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, हा फरार कैदी नवी मुंबई परिसरात वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे LCB च्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली, पो.हवा/९०९ विजय आंबेकर, पो.हवा/१४०७ दिपराज पाटील, पो.हवा/२६२ विवेक रसाळ आणि चा.पो.कॉ/२१५ अतुल कांबळे यांच्या पथकाने आज, २० जून २०२५ रोजी नवी मुंबई येथे धडक कारवाई करत चन्नाप्पा गंगवारला ताब्यात घेतले. पुढील आवश्यक कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईमुळे गुन्हेगारी नियंत्रणात रत्नागिरी पोलिसांचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. -

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा ‘तुमच्या कॅमेऱ्यातून महाराष्ट्र’ छायाचित्रण उपक्रम
रत्नागिरी: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) ‘तुमच्या कॅमेऱ्यातून महाराष्ट्र’ या अनोख्या छायाचित्रण उपक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे वैविध्यपूर्ण सौंदर्य आणि अनुभवांना जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक, मा. मनोजकुमार सूर्यवंशी (भाप्रसे) यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे छायाचित्रकारांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे सौंदर्य जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाईल.
महाराष्ट्राच्या धुक्याने वेढलेल्या किल्ल्यांपासून ते सोनेरी वाळूने नटलेल्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, शांत आणि मनोहर एमटीडीसी रिसॉर्ट्सपासून ते हिरवाईने भरलेल्या डोंगररांगांपर्यंतचे क्षण टिपण्यासाठी छायाचित्रप्रेमींना आवाहन करण्यात आले आहे. कोकणाच्या किनाऱ्यांवरील लाटा, सह्याद्रीच्या दऱ्यांमधील धुक्याने सांगितल्या जाणाऱ्या इतिहासाच्या कहाण्या, गावातील मळ्यांमधील निळसर आकाश आणि उत्सवांमधील महाराष्ट्राचे स्पंदन कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हा उपक्रम एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देईल. नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि रोजच्या जीवनातील अस्सल मराठमोळे अनुभव या स्पर्धेचा भाग असतील.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी, महाराष्ट्रातील कोणत्याही एमटीडीसी पर्यटनस्थळी काढलेले आपले आवडते फोटो https://forms.gle/rpUWF8zTQudr7jzh8 या लिंकवर अपलोड करावे लागतील.
स्पर्धेसाठीचे निकष खालीलप्रमाणे आहेत:
दृश्य प्रभाव व सौंदर्यदृष्टी
सांस्कृतिक, नैसर्गिक व भौगोलिक सुसंगती
सर्जनशीलता, कलात्मक मांडणी व छायाचित्रामागची कथा
या उपक्रमात दररोज, दर आठवड्याला, महिन्याला आणि वर्षाभरात सर्वोत्तम छायाचित्रांची निवड केली जाईल. निवडक छायाचित्रे एमटीडीसीच्या अधिकृत वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि विविध कार्यक्रमांमध्ये प्रदर्शित केली जातील, ज्यामुळे छायाचित्रकारांना अनोखी प्रसिद्धी मिळेल. प्रत्येक आठवड्यातून व महिन्यातून निवडक फोटो ‘Image of the Day’, ‘Image of the Week’ आणि ‘Image of the Month’ म्हणून गौरवले जातील. महिन्याच्या विजेत्यांना विशेष सन्मानचिन्ह प्रदान केले जाईल. वर्षाअखेरीस, ‘Image of the Year’ म्हणून निवड झालेल्या पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जातील, तसेच टॉप १० उत्कृष्ट फोटोंसाठी ‘Honourable Mention’ देखील दिली जाईल.पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मा. डॉ. अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असून, महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल सर्वांशी समन्वय साधून आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली. अधिक माहितीसाठी www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
-

बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची फसवणूक: तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर
रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निकाल
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी (RDCC) बँकेच्या देवरुख शाखेत बनावट कर्ज व्यवहार करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर, रत्नागिरी सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख येथील RDCC बँकेच्या शाखेत बनावट कागदपत्रे सादर करून बँकेची फसवणूक केल्याचा आरोप प्रथमेश शिरीष पवार आणि श्वेता शिरीष पवार (दोघेही रा. मेघी) यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांच्याकडे एकूण 35.28 लाख रुपये कर्ज रकमेची थकबाकी होती. विशेष म्हणजे, घर नसतानाही सातबारा उताऱ्यात खोटी माहिती नमूद करून बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
याच प्रकरणात मोअज्जम महंमद साटविलकर (रा. देवरुख) यांनीही जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतले होते. वाहन खरेदीसाठी बिगरशेती कर्ज योजनेअंतर्गत त्यांनी 25 लाख आणि 28 लाख रुपये असे दोन कर्ज घेतले होते. कर्ज मिळवण्यासाठी खोटी आणि बनावट तारण कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या तिघांविरोधात बँकेने पोलीस अधीक्षकांकडे फौजदारी कारवाईसाठी अर्ज दिला होता.
या तिन्ही आरोपींनी ऍड. भाऊ शेट्ये यांच्यामार्फत रत्नागिरीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. सत्र न्यायाधीश अनिलकुमार आंबोळकर यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणामुळे सहकारी बँकांमधील कर्ज वाटप प्रक्रियेतील त्रुटी आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून होणाऱ्या फसवणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.