सावर्डे: महावितरण कंपनीतील एका अधिकाऱ्याला वारंवार खोट्या तक्रारी करून, तसेच जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख करत मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सावर्डे येथील सहा आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गिरीश कोकाटे, अजित कोकाटे, साहिल कोकाटे, सुनील जाधव, प्रदीप खांबे, सदानंद जाधव, अनिकेत घाणेकर, अनिल म्हादे, पारस जाधव,अशोक बिजितकर अशा दहा जणांवर सावर्डे पोलिस स्थानकात २९ सप्टेंबर २०२५ रोजी कलम ३(१)q आणि ३(१)u नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण सन २०२० ते २०२३ या कालावधीतील आहे. या दरम्यान, महावितरण कंपनीत उप व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले अशोक काजरोळकर यांच्या विरोधात आरोपींनी वारंवार लेखी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींमध्ये वीज बिल कमी करून देणे, नवीन कामांना मंजुरी देणे, तसेच कर्मचाऱ्यांकडून हप्ते घेणे अशा स्वरूपाचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व तक्रारींची कसून चौकशी केली असता, त्यामध्ये कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे कंपनीने त्या सर्व तक्रारी नियमानुसार नस्तिबंद केल्या होत्या.
कंपनी स्तरावर पुरावे नसल्याने तक्रारी बंद झाल्यानंतरही, आरोपींनी तक्रारी करण्याचा सिलसिला सुरूच ठेवला. वारंवार खोट्या तक्रारी करून आणि या तक्रारींमध्ये जाणीवपूर्वक जातीवाचक शब्दांचा वापर करून काजरोळकर यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेरीस अशोक काजरोळकर यांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत सावर्डे पोलिस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी सुनील जाधव हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, तर अजित कोकाटे आणि गिरीश कोकाटे यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, ते सध्या सेशन कोर्टाने दिलेल्या अटी-शर्तीच्या जामीनावर बाहेर आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधीक्षक श्री. प्रकाश बेले करत आहेत.