रत्नागिरी: शहरातील राजीवडा पुलाखाली उसन्या पैशांवरून झालेल्या वादातून चार आरोपींनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची आणि त्याच्या बहिणीलाही मारहाण व दमदाटी केल्याची घटना घडली आहे. यात लोखंडी रॉडने डोक्याला मार लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची फिर्याद रमजान नवाज मिरकर (वय २१, रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) यांनी दिली आहे. यानुसार अरमान नजीर होडेकर, नजीर हसनमियों होडेकर, सलमान (सर्व रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) आणि नियाज (रा. विजापूर) या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमजान मिरकर यांनी सुमारे वीस दिवसांपूर्वी आरोपी अरमान नजीर होडेकर याला १५,००० रुपये उसने दिले होते. हे पैसे त्याने परत केले नव्हते. याच पैशांच्या मागणीसाठी रमजान मिरकर हे २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराशेजारी, राजीवडा पुलाखाली अरमान होडेकर याच्याकडे गेले.
पैसे परत करण्याबद्दल विचारणा करताच आरोपी अरमान होडेकर याने “तू पैसे केव्हा दिलेस, मी पैसे घेतलेच नाही,” असे बोलून वाद घालण्यास सुरुवात केली आणि रमजान मिरकर यांच्या टी-शर्टची कॉलर पकडून त्यांना हाताने मारहाण केली. त्याचवेळी आरोपी सलमान याने अचानक येऊन लोखंडी रॉडने रमजान मिरकर यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत केली. इतकेच नाही तर आरोपी नजीर हसनमियों होडेकर यानेही येऊन फिर्यादी रमजान यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत रमजान यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांची बहीण सबिस्ता सुभान फणसोपकर ही हळद लावण्यासाठी तिथे आली. तेव्हा आरोपी नियाज याने सबिस्ता यांच्या पोटात लाथ मारली, तर आरोपी अरमान होडेकर याने त्यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन त्यांनाही मारहाण केली.
शेजारी राहणारे शाकीब फणसोपकर यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले आणि जखमी रमजान नवाज मिरकर यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.







