रत्नागिरी : शहरातील फणसोप सडा, लक्ष्मीकेशव नगर येथील एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना तातडीने रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृतक पुरुषोत्तम साळवी (वय ६३, रा. फणसोप सडा) हे गेल्या चार-पाच वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू होते. रत्नागिरीतील फणसोप बस स्टॉपजवळ त्यांचे जनरल स्टोअरचे दुकान होते.
दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचे चिरंजीव, तक्रारदार दीपक पुरुषोत्तम साळवी, हे वडिलांना दुकानात पाहण्यासाठी गेले. त्यावेळी दुकानाचा लोखंडी दरवाजा बाहेरून कडी लावलेला होता, तर आतील दरवाजा उघडा होता.
आतमध्ये जाऊन पाहिले असता, पुरुषोत्तम साळवी हे दुकानाच्या आतील गॅल्व्हनाईज्ड पाईपला फिटिंगच्या वायरने गळ्याला फास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळले.
दीपक साळवी यांनी तातडीने परिसरातील लोकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवले आणि एका खासगी ॲम्ब्युलन्सने उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती रात्री ८.०० वाजता पुरुषोत्तम साळवी यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०९/२०२५, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
रत्नागिरीत मानसिक रुग्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या







