GRAMIN SEARCH BANNER

सणासुदीच्या सुट्ट्यांत रायगड किनाऱ्यांवर पर्यटकांची लाट

Gramin Varta
18 Views

रायगड : जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनसह अनेक किनारी भागांमध्ये पर्यटकांनी हाऊसफुल वातावरण निर्माण केले असून, त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.

पावसाळ्यात मुंबईहून होणारी जलवाहतूक बंद असल्याने कोकणातील पर्यटन क्षेत्र काहीसे ओस पडते. मात्र, सणासुदीचा हंगाम आणि पावसाळ्यानंतरची थंड हवा सुरू होताच पर्यटक पुन्हा कोकण किनारपट्टीकडे आकर्षित होत आहेत. दिवाळीपासून पुढील काही महिने हा पर्यटनाचा सर्वोच्च हंगाम असतो. सध्या त्याची झलक रायगड जिल्ह्यात ठळकपणे दिसत आहे.

सलग सुट्ट्यांमुळे अलिबाग परिसरातील आवास, सासवणे, किहीम, वरसोली, नागाव, रेवदंडा या किनाऱ्यांवर सुमारे २५ हजार पर्यटक दाखल झाले. तर मुरुड, काशिद, नांदगाव परिसरातही पंधराहजारांहून अधिक पर्यटकांची गर्दी झाली. श्रीवर्धन व हरिहरेश्वर येथेही मोठ्या संख्येने पर्यटकांनी समुद्रस्नान, जलक्रीडा आणि समुद्र सफरीचा आनंद घेतला.

पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिक व्यावसायिकांचेही उत्पन्न वाढले आहे. हॉटेल, लॉजेस, खाद्यपदार्थ विक्रेते, बोटींग, एटीव्ही राईड, बनाना राईड, घोडेसफारी यांसारख्या व्यवसायांना जोर मिळाला आहे. नारळ विक्रेते, स्टॉलधारक आणि जलक्रीडा आयोजकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.

तथापि, या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव परिसरात मोठी कोंडी होत असून, श्रीवर्धन व हरिहरेश्वरकडे जाणारे पर्यटक अडकून पडत आहेत. अलिबाग-मुरुड मार्गावरही वडखळ ते कार्लेखिंडदरम्यान तासन्तास वाहनांचा खोळंबा होत आहे.

पर्यटनामुळे अर्थचक्राला चालना मिळत असली, तरी सुट्ट्यांतील गर्दीचे व्यवस्थापन हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरले आहे.

Total Visitor Counter

3199275
Share This Article