रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि कोकणातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून ६ व ७ डिसेंबर रोजी करंबेळे तर्फे देवळे गोताड वाडी येथे आयोजित रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या कुणबी महोत्सवात व्यावसायिक शेती वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती देणारी छापील पत्रके उपस्थित नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची माहिती कुणबी महोत्सव चे आयोजक सुहास खंडागळे व उदय गोताड यांनी दिली आहे. एकेकाळी कोकणातील अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून होती. मात्र, गेल्या काही वर्षांत कोकणातून मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर थांबवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. शासनाचे व्यावसायिक शेतीकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन, शेतकरी आणि भावी पिढ्यांमध्ये व्यावसायिक शेतीबद्दल प्रगत दृष्टिकोन निर्माण व्हावा या उदात्त हेतूने हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
व्यावसायिक शेतीची माहिती मोफत:-
महोत्सवात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व्यावसायिक शेती संदर्भातील माहितीपत्रक व मार्गदर्शन मोफत मिळेल. या माहितीच्या आधाराने येथील नागरिकांमध्ये व्यावसायिक शेतीची भावना वाढावी आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
खंडागळे आणि गोताड यांनी सांगितले की, या माहिती पत्रकांमध्ये ग्रामीण भागात व्यावसायिक शेती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रभावी उपाययोजनांची माहिती असेल. ६ व ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या या महोत्सवात हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार आहे.
संस्कृती, कला, स्वाभिमान आणि प्रबोधनाचा संगम:-
या कुणबी महोत्सवात कुणबी संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, कला, क्रीडा आणि स्वाभिमान यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. यासोबतच, व्यावसायिक शेतीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी याकरिता कुणबी महोत्सवात समाज प्रबोधन देखील केले जाणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.





