रत्नागिरी: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील पानवल परिसरात मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास एका भरधाव डंपरने पादचारी तरुणाला जोरदार धडक दिली गंभीर घटना घडली आहे. या अपघातात सोनू रामलाल हलवारी वय ३२, रा. खेडशी, रत्नागिरी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी हा अपघात झाला. खेडशी येथील रहिवासी असलेला सोनू हलवारी हा तरुण मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर या गजबजलेल्या मार्गावरून पायी जात होता. याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती, की सोनू रस्त्यावर कोसळला आणि त्याच्या शरीराला गंभीर दुखापत झाली.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी सोनू हलवारी याला मदत केली. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डंपरच्या चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.






