GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: इच्छुक उमेदवारांमुळे १० लाखांची विक्रमी करवसुली

Gramin Varta
91 Views

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, ही निवडणूक पालिकेच्या प्रशासनासाठी मात्र आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरली आहे. एरवी करवसुलीसाठी कर्मचाऱ्यांना विशेष मोहिमा राबवाव्या लागतात, मात्र निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांना थकबाकी भरणे बंधनकारक असल्याने अल्पावधीतच पालिकेच्या तिजोरीत १० लाख ३६ हजार ८३१ रुपयांची भर पडली आहे.

कोणत्याही शहराचा विकास आणि नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधीची नितांत गरज असते. हा निधी उभारण्यासाठी पालिकांकडे प्रामुख्याने दोन स्रोत असतात, एक म्हणजे शासनाकडून विविध विकासनिधीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम आणि दुसरे म्हणजे स्थानिक नागरिकांकडून विविध करांच्या रूपाने मिळणारे उत्पन्न. विशेषतः राजापूरसारख्या ‘क’ वर्ग नगरपालिकेला शासनाकडून मिळणारा निधी आणि तुटपुंजे उत्पन्न यामुळे शहराचे रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांचा डोलारा सांभाळताना कसरत करावी लागते. त्यामुळे शहराच्या विकासासाठी नागरिकांकडून मिळणारा कर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. साधारणपणे १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीत ही करवसुली पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असते आणि त्यासाठी अनेकदा कटू कारवाई किंवा विशेष पथके नेमावी लागतात.

मात्र, यंदाच्या निवडणुकीने हे वसुलीचे काम प्रशासनासाठी अत्यंत सोपे केले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवाराला तो पालिकेचा थकबाकीदार नसल्याचे सिद्ध करावे लागते. केवळ उमेदवारच नव्हे, तर उमेदवाराच्या अर्जावर स्वाक्षरी करणाऱ्या सूचकांकडेही पालिकेची कोणतीही थकबाकी असता कामा नये, अशी अट आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या लगबगीत आणि आपला अर्ज बाद होऊ नये या भीतीपोटी इच्छुकांनी स्वतःसह आपल्या सूचकांचीही थकबाकी तातडीने भरण्याला प्राधान्य दिले. या कालावधीत इच्छुकांनी रांगा लावून कर भरल्याने पालिकेच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आहे.
निवडणूक कालावधीत झालेल्या या विक्रमी वसुलीची आकडेवारी पाहता, घरपट्टीच्या माध्यमातून सर्वाधिक म्हणजेच ७ लाख ६१ हजार ७८१ रुपये पालिकेच्या खात्यात जमा झाले आहेत. त्याखालोखाल पाणीपट्टीच्या स्वरूपात २ लाख ७५ हजार ०५० रुपयांची वसुली झाली आहे. अशा प्रकारे घरपट्टी आणि पाणीपट्टी मिळून एकूण १० लाख ३६ हजार ८३१ रुपये जमा झाले आहेत. नागरी सुविधांसाठी निधीची कमतरता भासणाऱ्या राजापूर पालिकेसाठी ही निवडणूक आणि त्यानिमित्ताने झालेली ही वसुली एक मोठा आर्थिक दिलासा ठरली आहे.

Total Visitor Counter

3380005
Share This Article