GRAMIN SEARCH BANNER

‘माझं गाव’… अभिनेता सिद्धार्थ जाधव राजापूरच्या केळवलीत; बालपणीच्या शाळेचा फोटो शेअर करत जागवल्या जुन्या आठवणी

Gramin Varta
989 Views

राजापूर: मराठी चित्रपटसृष्टीतील ‘एनर्जी किंग’ म्हणून ओळखला जाणारा आणि आपल्या अफाट ऊर्जेने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. चंदेरी दुनियेत वावरत असताना आणि यशाच्या शिखरावर असतानाही सिद्धार्थची नाळ आजही कोकणच्या तांबड्या मातीशी घट्ट जोडलेली आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सिद्धार्थ जाधव हा मूळचा कोकणचा असून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील केळवली हे त्याचे गाव आहे. नुकतीच सिद्धार्थने आपल्या गावाला भेट दिली असून, तिथल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कामाच्या व्यापातून वेळ काढत सिद्धार्थ नुकताच आपल्या मूळ गावी म्हणजेच राजापूरच्या केळवलीत दाखल झाला. गावी पोहोचल्यावर बालपणीच्या आठवणींमध्ये रममाण होण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. सिद्धार्थचे बालपण याच गावात गेले असून त्याचे प्राथमिक शिक्षणही केळवलीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. या शाळेचा आणि परिसराचा फोटो काढण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्याने सोशल मीडियावर शाळेचा आणि निसर्गरम्य परिसराचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिद्धार्थचे वडील कामानिमित्त मुंबईला असत, मात्र सिद्धार्थ आणि त्याच्या भावंडांचे बालपण गावातच गेले. मुले थोडी मोठी झाल्यानंतर वडील संपूर्ण कुटुंबाला घेऊन मुंबईत स्थायिक झाले. मुंबईत गेल्यानंतर आणि स्टार झाल्यानंतरही सिद्धार्थच्या मनात आपल्या गावाबद्दलचे प्रेम आणि अनेक आठवणी आजही ताज्या आहेत.

गावातील घर, ती शाळा आणि आजूबाजूचा निसर्ग या गोष्टी सिद्धार्थसाठी आजही तितक्याच जिव्हाळ्याच्या आहेत. ‘माझं गाव’ म्हणत त्याने व्यक्त केलेले हे प्रेम त्याच्या चाहत्यांनाही भावले आहे. ग्लॅमरच्या जगात वावरतानाही आपली मुळे न विसरणाऱ्या सिद्धार्थचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजापूर तालुक्यातील केळवली गावाशी आपले नाते सांगताना त्याला नेहमीच अभिमान वाटत आला आहे, हेच या दौऱ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Total Visitor Counter

3072969
Share This Article