GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: शिरगाव व एमआयडीसी उपकेंद्र वीजपुरवठा दोन तासांत सुरळीत

Gramin Varta
235 Views

पेढांबे येथे 220 केव्ही टॉवरवरील अर्थिंग वायर तुटल्याने झाला होता बिघाड

चिपळूण : महावितरणचे कर्मचारी वीज ग्राहकांच्या सेवेत अविरत कार्यरत असतात. याचीच प्रचीती पुन्हा एकदा चिपळूण परिसरातील वीज ग्राहकांनी घेतली. तांत्रिक बिघाड झाल्याने शिरगाव व एमआयडीसी उपकेंद्रांचा बाधित झाला होता. यामुळे सुमारे १५ हजार घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहक व सुमारे ७५० उच्चदाब ग्राहक यांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी या सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा अवघ्या दोन तासांत पूर्ववत केला.

उपविभाग चिपळूण ग्रामीण येथील पेढांबे परिसरात 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता महावितरणच्या 220 केव्ही लाईनवर तांत्रिक बिघाडाची घटना घडली. 220 केव्ही सर्किटच्या टॉवरवरील अर्थिंग वायर तुटून ती थेट 11 केव्ही शिरगाव व कोळकेवाडी फिडरवर कोसळली. या घटनेत दोन्ही फिडरचे 11 केव्ही कंडक्टर तुटून वीजपुरवठा बाधित झाला. यामुळे शिरगाव उपकेंद्राबरोबरच एमआयडीसी उपकेंद्र पूर्णपणे प्रभावित झाले.

बिघाड दुरुस्त करणे आव्हानात्मक असतानाही महावितरणच्या पथकाने तात्काळ परिस्थिती हाताळत पर्यायी मार्गांचा वापर करून वीजपुरवठा सुरू केला. 400 केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या 33 केव्ही शिरगाव फिडरवरून प्रथम एमआयडीसी उपकेंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यात आले व उपकेंद्रातील फिडर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. पुढे 33 केव्ही एक्सप्रेस फिडर पूर्ण क्षमतेने चालू करण्यात आला. कोळकेवाडी व शिरगाव फिडरवरील काही भाग पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या समन्वय आणि तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांत म्हणजे रात्री 8.30 वाजता शिरगाव सेक्शनचा संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. या कार्यात शिरगाव व एमआयडीसी सेक्शनच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली. घटनास्थळी उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर (चिपळूण), शाखा अभियंते तेजश्री उगारे (शिरगाव) व अमोल मोहिते (धामणंद) यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या मोहिमेत चिपळूण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे हे सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वीज पुरवठा अल्पावधीतच पूर्ववत करण्यात यश आले. अचानक खंडित झालेला वीजपुरवठा अल्पावधीत सुरळीत झाल्याने परिसरातील नागरिकांसह एमआयडीसीतील ग्राहकांनी महावितरण पथकाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. तसेच या मोहिमेत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये व रत्नागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने यांनी कौतुक केले आहे.

Total Visitor Counter

3081328
Share This Article