GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात सव्वा लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त; ६७ बॉक्स, क्रेटा कारसह एक संशयित ताब्यात

Gramin Varta
439 Views

राजापूर : शहरातील बौद्धवाडी परिसरात रविवारी करण्यात आलेल्या धडक कारवाईत राजापूर पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ६७ बॉक्स जप्त केले आहेत. या दारूची किंमत सुमारे १ लाख १५ हजार ९२० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे पाच लाख रुपये किमतीची क्रेटा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

या प्रकरणी रोहित अंबाजी इंगळे (रा. बंगलवाडी, राजापूर) या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली.

राजापूर तालुक्यात छुप्या पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक व विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. यापूर्वीही एसटी डेपो परिसरात अशाच प्रकारे दारू वाहतूक करणारे टेम्पो पोलिसांनी पकडले होते. मात्र, कारवाया होऊनही हे बेकायदेशीर प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र आहे.

रविवारी बौद्धवाडी भागात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स भरलेली कार उभी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, दिपज्योती पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी अनिल केसकर, प्रथमेश वारिक, डिगंबर शेलार व वाहनचालक हर्षद मुल्ला यांच्या पथकाने दुपारी सुमारे १ वाजता छापा टाकला.

या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचे ६७ बॉक्स, केटा कार (क्रमांक MH-05-EA-0661) असा एकूण ६ लाख १५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५२/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

Total Visitor Counter

3375164
Share This Article