GRAMIN SEARCH BANNER

गुहागर: क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला; तीन दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार, आरोपी अद्याप मोकाट

Gramin Varta
455 Views

गुहागर : मुंबई येथून क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या ३६ वर्षीय तरुणावर शनिवारी मध्यरात्री ‘तू कसा क्रिकेट खेळतोस’ असे ठणकावत वाहनातील टॉमीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आरेमध्ये घडली. या मारहाणीत तरुण जबर जखमी झाला असून गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, हा प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी अद्याप अटक न केल्याने गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

जयेश जनार्दन खोत (वय ३६, रा. आरे भंडारवाडा, सध्या कल्याण वेस्ट) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जयेश खोत याने गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अविनाश शेट्ये (३५), ओंकार बोरकर (३२) आणि साईप्रसाद बोरकर (३१, सर्व राहणार आरे भंडारवाडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा जयेश खोत आरे येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता गावात आला होता. रात्री मामाकडे जेवण आटोपल्यानंतर तो आपला भाऊ जितेंद्र किरण देवकर याच्यासह रात्री सव्वा बाराच्या सुमारास आरे गावातील श्री दत्त मंदिरानजीक नदीकिनारी रस्त्याशेजारी गप्पा मारत बसला होता.

रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अविनाश शेट्ये, ओंकार बोरकर आणि साईप्रसाद बोरकर हे काळ्या रंगाची थार गाडी घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी जयेशला ‘तू क्रिकेट का खेळतोस’ असे विचारून आई-वडिलांवरून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. याच वादातून अविनाश शेट्ये याने गाडीतील टॉमी काढून जयेशच्या कपाळावर जोराने प्रहार केला, तर साईप्रसाद बोरकर याने दगडाने त्याच्या गुडघ्यावर आणि ठोशाने उजव्या गालावर मारून गंभीर दुखापत केली. यावेळी जयेशचा आतेभाऊ जितेंद्र देवकर यालाही आरोपींनी धक्काबुक्की केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयेशला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. गुहागर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Total Visitor Counter

3380005
Share This Article