GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत पाण्याचे मीटर चोरणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Gramin Varta
232 Views

रत्नागिरी:रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या पाण्याचे मीटर चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी एका सराईत चोरट्याला गजाआड करण्यात आले आहे. साहिल संजय जाधव (वय २५, रा. फगर वठार, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचे मीटर हस्तगत करण्यात आले आहेत. शहरातील बीएसएनएल ऑफिस परिसरातून २४ ते २५ फेब्रुवारी दरम्यान तीन पाण्याचे मीटर चोरीला गेल्याप्रकारणी ६ मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तपासादरम्यान गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी साहिल जाधव याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बीएसएनएल ऑफिस परिसरातील तीन मीटर चोरल्याची कबुली दिली, ज्याची किंमत साधारण १,००० रुपये आहे. अधिक चौकशीत या आरोपीने २०२५ मधील एका घरफोडीच्या गुन्ह्यातही आपला सहभाग असल्याचे कबूल केले आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर तक्रारी अर्जांमधील चोरीला गेलेले मीटर जप्त करण्याची प्रक्रिया आता वेगवान झाली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, दीपक साळवी, अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर आणि अमित पालवे यांच्या पथकाने केली आहे.

Total Visitor Counter

3199514
Share This Article