GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीकरांना दिलासा: जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय, ११ हजार टन गॅसचे जहाज जयगडमध्ये रोखले

Gramin Varta
845 Views

रत्नागिरी:गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत जाणवणारी गॅस टंचाई आणि त्यातून निर्माण झालेली साशंकता दूर करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने अत्यंत धाडसी आणि तत्पर पाऊल उचलले आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनासह गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसह व्यावसायिकांचेही हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी जिंदल यांनी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करत जयगड बंदरात ११ हजार टन गॅस वाहून नेणारे एक अजस्त्र जहाज थांबवले आहे. या जहाजातून जिल्ह्यासाठी सुमारे ८५० टन गॅसचा साठा राखीव ठेवण्यात येणार असून, यामुळे संभाव्य टंचाईचे संकट पूर्णपणे टळले आहे.जिल्ह्यातील गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये आणि नागरिकांना वेळेत सिलिंडर मिळावा, या उद्देशाने प्रशासनाने हा ‘बॅकअप प्लॅन’ तयार ठेवला आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्याकडे घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी पुरेसा साठा उपलब्ध असून, वितरणाचे नियोजनही चोख आहे. त्यामुळे सध्याचा साठा संपल्यानंतर आणि खरोखरच गरज भासली, तरच या जहाजातील गॅसचा वापर केला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिक आणि व्यावसायिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त साठा करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. प्रशासनाच्या या थेट नियंत्रणामुळे आणि तत्पर हालचालींमुळे रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळाला असून, ऐन टंचाईच्या काळात उद्भवू शकणारी मोठी गैरसोय आता टळली आहे.

Total Visitor Counter

3368662
Share This Article