दीडशे कोटींचा निधी मंजूर, धरणांसाठी ५५० कोटींच्या निधीचा प्रयत्न – ना. योगेश कदम
खेड (प्रतिनिधी) : दापोली मतदारसंघाला तब्बल पन्नास वर्षांनंतर राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळे आता मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याची मोठी संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. पन्नास वर्षांचा कालावधी खूप मोठा असल्याने या काळात काही विकासकामे राहून गेली आहेत. ती कामे पूर्ण करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या राज्याचे अधिवेशन सुरू असतानाही दोन दिवसांची सुट्टी मिळाल्यामुळे आपण मतदारसंघात आलो आहोत.
या अधिवेशनात दापोली मतदारसंघासाठी तब्बल दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. या निधीमुळे विविध विकासकामांना चालना मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मतदारसंघातील अनेक धरणांची कामे गेली तीस-तीस वर्षे रखडलेली असून ती मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत धरणांच्या कामांसाठी ५५० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची मोठी घोषणा योगेश कदम यांनी केली.दरम्यान, शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती वाढत असल्यामुळे त्या भागांच्या विकासासाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील अनेक शहरांमध्ये अशा प्रकारे हद्दवाढ करून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याच अनुषंगाने खेड नगरपरिषद तसेच दापोली नगरपंचायतीच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक संकेतही त्यांनी दिले.






