GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये इंधन तुटवड्याच्या धास्तीने पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा

Gramin Varta
274 Views

चिपळूण/ शाहीद तुळवे : शहरात पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या चर्चेने आज सकाळपासूनच सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, याचा थेट परिणाम शहरातील पेट्रोल पंपांवर पाहायला मिळत आहे. इंधन संपण्याच्या भीतीपोटी सकाळपासूनच वाहनचालकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याने चिपळूणमध्ये प्रचंड गोंधळ आणि गर्दीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील प्रमुख मेहता पेट्रोल पंपावर दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून, इंधन भरण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

इंधन टंचाईच्या अफवा आणि संभाव्य तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती असून, प्रत्येक जण आपली टाकी पूर्ण भरून घेण्याच्या प्रयत्नात असल्याने पंपांवरील गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. विशेषतः कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसला असून, वेळेवर इंधन न मिळाल्याने अनेकांचे दैनंदिन नियोजन कोलमडले आहे. या संकटकाळात भर टाकणारी बाब म्हणजे मार्कंडी येथील सुवर्ण भास्कर पंप, मिरजोळी येथील दोन्ही पंप आणि वालोपे येथील एक पेट्रोल पंप सद्यस्थितीत बंद आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने सर्व ताण शहरातील मेहता पेट्रोल पंपावर येत असून, तेथील व्यवस्थापनाची देखील मोठी ओढाताण होत आहे. पंपांवर लागलेल्या या अभूतपूर्व रांगांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून, जोपर्यंत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3392110
Share This Article