GRAMIN SEARCH BANNER

“आम्ही वाट पाहतोय, तुम्ही येताय ना!” गणपतीपुळ्यात पर्यटकांसाठी चुलीवरचे जेवण; गैरसोयीला पर्याय

Gramin Varta
368 Views

गणपतीपुळे/वैभव पवार : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असला, तरी गणपतीपुळे येथील हॉटेल व्यावसायिकांनी हार मानलेली नाही. उलट, भाविक व पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारत सेवा अखंड सुरू ठेवली आहे.

सध्या गणपतीपुळे परिसरातील बहुतांश हॉटेल्समध्ये पारंपरिक चुलीवरच जेवण व नाश्ता तयार केला जात असून पर्यटकांना गरमागरम, चविष्ट पदार्थांचा आस्वाद मिळत आहे. गॅस टंचाईमुळे पूर्वीप्रमाणे विस्तृत मेनू उपलब्ध नसला, तरी निवडक पदार्थांमधूनही चुलीवरच्या जेवणाची खास चव पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, “आम्ही वाट पाहतोय, तुम्ही येताय ना!” अशा आशयाच्या पोस्ट सध्या स्थानिक हॉटेल व्यावसायिकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संदेशांद्वारे ते पर्यटकांना विश्वास देत असून प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी आपल्या तयारीची प्रचिती दिली आहे.

या उपक्रमामुळे भाविक व पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत असून अनेकांनी हॉटेल व्यावसायिकांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे. गॅस तुटवड्याच्या संकटातही सेवा सुरू ठेवण्याचा हा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

दरम्यान, गणपतीपुळे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांनी सर्व भाविक व पर्यटकांना आवाहन केले आहे की, श्री क्षेत्र गणपतीपुळेला मोठ्या संख्येने भेट द्यावी. येथे जेवण-नाश्त्याची कोणतीही अडचण नसून, आपल्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

3376918
Share This Article