GRAMIN SEARCH BANNER

परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम अंतिम टप्प्यात; १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या कंत्राटदाराला सूचना

Gramin Varta
83 Views

चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या परशुराम घाटातील रखडलेल्या कामांना आता वेग आला असून, येथील गॅबियन वॉलचे काम येत्या १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदार कंपनीला देण्यात आल्या आहेत. ५.४० किलोमीटर अंतराच्या या घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत होत्या, ज्यामुळे येथील संरक्षक भिंतींना धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ‘टीएचडीसीएल’ संस्थेच्या शिफारशीनुसार कोट्यवधी रुपये खर्चून डोंगराला जाळी बसवणे आणि गॅबियन वॉल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या अकाली पावसामुळे घाटातील कामांचे नियोजन कोलमडले होते आणि अर्धवट अवस्थेतील गॅबियन वॉल काही ठिकाणी कोसळली होती. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग विभागाने त्यावेळी काम थांबवून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. पावसाळ्यानंतर या कामाच्या रचनेत आवश्यक बदल करून पुन्हा एकदा बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, आता हे काम पूर्णत्वाकडे झुकले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी घाटातील सर्व तांत्रिक कामे उरकून वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर आणण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि कंत्राटदार कंपनीने ठेवले आहे.

परशुराम घाटातील भौगोलिक आव्हाने लक्षात घेता, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा खंडाळा घाटाच्या धर्तीवर येथेही ‘व्हाया डक्ट’ पूल उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासाठी नुकतीच अभ्यास करणारी एजन्सी नेमण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, या प्रस्तावाला आणि प्रत्यक्ष कामाला वेळ लागणार असल्याने, तत्पूर्वी पावसाळ्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत गॅबियन वॉलचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेणचे पंकज गोसावी यांनी दिली आहे.

Total Visitor Counter

3391843
Share This Article