GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण-गुहागर मार्गावर एसटी फेऱ्यांचा तुटवडा; प्रवाशांची मोठी कुचंबना, कोकण प्रवासी महासंघाचे रत्नागिरी विभागाला निवेदन

Gramin Varta
69 Views

चिपळूण: चिपळूण ते गुहागर मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने पुरेशा एसटी बस सोडल्या जात नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण प्रवासी महासंघाच्या वतीने रत्नागिरी विभाग नियंत्रकांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले आहे. चिपळूण आणि गुहागर या दोन्ही आगारांतून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये एक ते सव्वा तासाचे अंतर असल्याने बस स्थानकातच पूर्ण भरून जातात. परिणामी, बसमध्ये ३० ते ४० प्रवासी उभे राहून प्रवास करतात, तर तितकेच प्रवासी गाडीत जागा नसल्याने स्थानकावरच मागे उरतात. यामुळे मार्गावरील मधल्या थांब्यांवर उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांना गाडीत प्रवेश मिळणे अशक्य झाले असून, प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

या मार्गावर विशेषतः दुपारी १ ते ४ या वेळेत बसच्या फेऱ्यांची संख्या अत्यंत कमी असल्याचे महासंघाने निवेदनात नमूद केले आहे. यामुळे वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, महिला आणि विद्यार्थ्यांचे आतोनात हाल होत असून प्रवाशांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘प्रवासी हे आमचे दैवत’ असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाची प्रतिमा या ढिसाळ नियोजनामुळे मलीन होत आहे.

गुहागर आगारातून चिपळूणकडे येणाऱ्या गाड्यांची स्थितीही सारखीच असून, तळीसारख्या महत्त्वाच्या थांब्यांवर मोठ्या संख्येने प्रवासी ताटकळत असतात. प्रवाशांच्या या गैरसोयीमुळे एसटीबद्दलचा आदर कमी होत असून ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी चिपळूण ते गुहागर मार्गावर तातडीने सर्वेक्षण करावे आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन फेऱ्यांच्या नियोजनात सुधारणा करावी, अशी आग्रही मागणी महासंघाकडून करण्यात आली आहे. या निवेदनावर कोकण प्रवासी महासंघाचे अध्यक्ष गणेश चव्हाण, सचिव वसंत भोसले, उपाध्यक्ष दीपक शिरकर, कार्याध्यक्ष अनिलकुमार जोशी यांच्यासह संपर्कप्रमुख दिलीप चव्हाण, दत्ताराम जाधव, सल्लागार मनोहर साळवी आणि सत्यवान महापुस्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास प्रवाशांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3391843
Share This Article