GRAMIN SEARCH BANNER

इराणचा कुवैतच्या वीज आणि पाणीपुरवठा प्रकल्पावर हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

Gramin Varta
228 Views

कुवेत: खाडी देशातील वीज मंत्रालयाने सोमवारी माहिती दिली की, कुवैतमधील एका वीज केंद्रावर इराणने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून त्या ठिकाणावरील एका इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कुवैतच्या वीज, पाणी आणि ऊर्जा मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून याला देशाविरुद्ध इराणची आक्रमक कारवाई असे संबोधण्यात आले आहे.

मंत्रालयाच्या प्रवक्त्या इंजिनिअर फातिमा अब्बास जौहर हयात यांनी सांगितले की, “कुवैतविरुद्धच्या इराणी आक्रमणादरम्यान वीज आणि जल-विलवणीकरण प्रकल्पातील सर्व्हिस इमारतीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.”

खाडी प्रदेशातील अनेक देशांप्रमाणे कुवैतलाही अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा फटका बसला आहे. तेहरानने पश्चिम आशियातील विविध पायाभूत सुविधा आणि अमेरिकन तळांना लक्ष्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कुवैतच्या संरक्षण मंत्रालयाने स्वतंत्र निवेदनात सांगितले की, सुमारे महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या या संघर्षानंतर देशावर आतापर्यंत एकूण 307 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, दोन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि 616 ड्रोन डागण्यात आले आहेत.

संरक्षण मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 14 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 12 शत्रू ड्रोन शोधून त्यांचा नाश करण्यात आला. माध्यमांशी बोलताना मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल सौद अल-अतवान यांनी सांगितले की, यापैकी काही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने कुवैती सशस्त्र दलांच्या एका तळाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 10 कर्मचारी जखमी झाले असून त्या ठिकाणाचे मोठे नुकसान झाले आहे.

Total Visitor Counter

3245587
Share This Article