GRAMIN SEARCH BANNER

पाचलमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड; १०९४ ग्राहक कार्ड जप्त, पुरवठा विभागाची धडक कारवाई

Gramin Varta
344 Views

पाचल (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, पुरवठा विभागाने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. येथील ‘सद्गुरु गॅस सेवा’ या सर्व्हिस सेंटरवर छापा टाकून प्रशासनाने तब्बल १०९४ ग्राहकांची गॅस पुस्तिका (कार्ड) आणि एक कमर्शियल सिलेंडर जप्त केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचल येथील या सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकांकडून त्यांची गॅस कार्ड्स जमा करून घेतली जात होती. त्यानंतर या कार्डांचा वापर करून सिलेंडरचे बुकिंग केले जाई आणि प्रत्यक्षात ग्राहकांना गॅस न देता हे सिलेंडर चढ्या दराने विक्री केले जात असल्याचा संशय आहे. काही ग्राहकांच्या नावावर सिलेंडरची उचल होऊनही त्यांना गॅस मिळाला नसल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला. सध्याच्या गॅस टंचाईच्या काळात ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणावर नफेखोरी केली जात असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

राजापूर पुरवठा विभागाने या तक्रारींची दखल घेत १ एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास या केंद्रावर धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत १०९४ गॅस पुस्तिका आणि भारत गॅसचे एक कमर्शियल सिलेंडर मिळून आले. ही सर्व कागदपत्रे आणि मुद्देमाल पुरवठा विभागाने तात्काळ जप्त केला आहे. या प्रकरणाबाबत सर्व्हिस सेंटरचे संचालक विलास भिकू कोलते यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ते गेल्या ४० वर्षांपासून ही सेवा देत असून ग्राहक स्वतःहून आपली गॅस पुस्तके त्यांच्याकडे ठेवून जातात. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने कार्ड्स एकाच ठिकाणी सापडल्याने प्रशासनाने या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे.

या धडक कारवाईत राजापूरचे पुरवठा निरीक्षक निलेश लाड, पाचल मंडळ अधिकारी सौ. पूनम गावित, तलाठी नरके, शशिकांत कांबळे, पुरवठा लिपिक विक्रम पाटील, ग्रामवसूल अधिकारी कृष्णा गोरड, कोतवाल अमित चिले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे आणि पत्रकार तुषार पाचलकर सहभागी झाले होते. गॅस कनेक्शनचे ट्रान्सफर, बुकिंगची प्रक्रिया आणि कार्डांचा अनधिकृत वापर या सर्व बाबींची आता सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, यातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. या कारवाईमुळे गॅस एजन्सींच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

Total Visitor Counter

3241168
Share This Article