GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात दारूबंदी मोहिमेचा धडाका; सहा जणांवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध मद्यविक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक मोहीम उघडली असून, १८ एप्रिल रोजी ग्रामीण, खेड, गुहागर आणि सावर्डे परिसरात केलेल्या विविध कारवायांमध्ये सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे.

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी खेडशी येथील रेल्वे पुलाजवळ कच्च्या रस्त्यावर राहुल गुलाब तिवारी (३८, रा. एमआयडीसी मिरजोळे) याला विनापरवाना बिअर पिताना रंगेहाथ पकडले.

खेड तालुक्यातील वाडीवेळ येथे खेड पोलिसांनी छापा टाकून भगवान लक्ष्मण साळुंखे (५५) याच्याकडून ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.

गुहागर तालुक्यातही दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. तळवली येथील गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर बालू रत्नु मुकनाक (७५) याला ५ लिटर गावठी दारूसह पकडण्यात आले, तर जामसुत मराठवाडी येथे सचिन सुधाकर झोंबडकर (३२) याला ५ लिटर गावठी दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.

सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिपळूण येथील कडप रोडवर पोलिसांनी केलेल्या गस्तीदरम्यान सूरज संदीप जाधव (३५), निलेश नारायण सावंत (३८) आणि महेश दत्ताराम धावडे (३५) हे तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करताना आढळले. या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हे नोंदवण्यात आले असून, जिल्ह्यातील अवैध दारूविक्री रोखण्यासाठी ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3485118
Share This Article