GRAMIN SEARCH BANNER

दापोली: उर्दू शाळेजवळ बॉक्साइटचा डंपर उलटला; मांदिवलीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मांदिवली: मांदिवली गावातील उर्दू शाळेजवळून सुरू असलेल्या बॉक्साइट वाहतुकीने आज दुपारी एका भीषण अपघाताचे रूप घेतले. मायनिंग साइटवरून बॉक्साइट घेऊन जाणारा एक वेगवान डंपर शाळेच्या परिसरातच उलटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, शाळेतील लहान मुले आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले असून प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे.

मांदिवली गावातून होणाऱ्या या अवजड वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या त्रासाविरोधात आधीच दिल्ली येथील मानवाधिकार आयोगाकडे दाद मागण्यात आली असून हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे. असे असतानाच आजच्या अपघाताने सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनवला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोवले आणि उंबरशेत येथून दररोज साधारण १५० ते २०० डंपर या गावातून ये-जा करतात. मांदिवलीकडे जाणारा रस्ता मुळातच अरुंद असून गावाजवळ तो अधिकच निमुळता होतो. मात्र, तरीही ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने या रस्त्यावरून धावत असतात, ज्यामुळे अपघाताची टांगती तलवार कायम असते.

विशेष म्हणजे, अनेक डंपरला नंबर प्लेट नसतानाही त्यांची वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आज झालेली घटना ही प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा असून, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. मानवाधिकार आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच, आता तातडीने ही वाहतूक थांबवावी किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी मांदिवलीवासीयांकडून जोर धरत आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी प्रशासनाने जागृत व्हावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3311846
Share This Article