GRAMIN SEARCH BANNER

गुहागरमध्ये इंजिनीअरची २६ लाखांची सायबर फसवणूक; गुंतवणुकीच्या बहाण्याने घातला गंडा

Gramin Varta
109 Views

गुहागर: फेसबुकवर ओळख वाढवून आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका इंजिनीअरला तब्बल २६ लाख ७६ हजार ९४१ रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयगड-तवसाळ पुलाच्या कामावर कार्यरत असलेले इंजिनीअर बिनय कमार सिन्हा (४८, मूळ रा. हरियाणा, सध्या रा. खंडाळा, जयगड) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अंकित शर्मा आणि आदिती शर्मा या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३१८, ३१९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिनय सिन्हा यांना फेसबुकवर आदिती शर्मा नावाच्या मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संवाद साधत तिने सिन्हा यांचा विश्वास संपादन केला. आदितीने त्यांना ‘ETH Ethereum Platform’ मध्ये ‘USDT’ क्रिप्टो करन्सीद्वारे गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले. त्यासाठी तिने त्यांना ‘cinchain’ प्लॅटफॉर्म लिंक आणि ‘binance’ ॲपवर खाते उघडण्यास भाग पाडले. या प्रक्रियेत मदत करण्यासाठी तिने तिचा साथीदार अंकित शर्मा याचा मोबाईल क्रमांक सिन्हा यांना दिला. अंकितने स्वतःला सीनियर फॉरेन एक्सचेंज ट्रेडिंग कन्सल्टंट असल्याचे भासवले.

या दोघांच्या सांगण्यावरून फिर्यादी सिन्हा यांनी २६ मार्च २०२६ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत वेळोवेळी एकूण २६ लाख ७६ हजार ९४१ रुपये ३० पैसे इतकी रक्कम गुंतवली. मात्र, गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर जेव्हा सिन्हा यांनी आपले पैसे काढण्याचा (विथड्रॉवल) प्रयत्न केला, तेव्हा त्यांना यश आले नाही. त्यांनी आदिती आणि अंकित यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांनीही कोणताही प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिन्हा यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या सायबर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींनी सोशल मीडियावर दिलेल्या गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3325605
Share This Article