गुहागर : तालुक्यातील पालशेत येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी गावातीलच एका माळरानात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सिद्धेश अशोक धातकर असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे पालशेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश हा २८ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास आपल्या घरी होता.
त्याने आईला जेवायला वाढ असे सांगितले आणि त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो दीर्घकाळ घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याचा गाव, परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर २९ एप्रिल रोजी गुहागर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ त्याचा शोध घेत असतानाच, सोमवारी ४ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पालशेत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या पाठीमागील माळरानात एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सिद्धेशने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अवघ्या २८ वर्षांच्या तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने पालशेत बाजारपेठ परिसरात शोककळा पसरली आहे.






