GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर नझीफा बागलकोटे विद्यालयात प्रथम

Gramin Varta
10 Views

कडवई : द एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई येथील विद्यार्थिनी नझीफा बागलकोटे हिने एसएससी परीक्षा २०२६ मध्ये ८५.८० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे शाळा परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नझीफा ही शिक्षक कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिचे वडील आयडीयल हायस्कूल रत्नागिरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर आई महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई येथे सहशिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत. घरातील शैक्षणिक वातावरण, पालकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि शिक्षणाबद्दलची जाणीव यामुळे नझीफामध्ये लहानपणापासूनच अभ्यासाची आवड निर्माण झाली.

अत्यंत मेहनती, अभ्यासू आणि शांत स्वभावाची ओळख असलेल्या नझीफाने वर्षभर नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण अभ्यास करत हे यश मिळवले. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि नियमित सराव यांच्या जोरावर तिने परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली. आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावत तिने शाळेच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.

नझीफाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मित्रपरिवाराने तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक भर पडली असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यातही ती शैक्षणिक क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करत यशाची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3369833
Share This Article