GRAMIN SEARCH BANNER

खेड तालुका हादरला ; १५ वर्षीय मुलीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
576 Views

खेड : तालुक्यात सोमवारी संध्याकाळी काळाने घाला घालत एकाच वेळी तीन जणांचा जीव घेतला. धामणंद गावातील काजू फाटा परिसरातील नागझरी नदीच्या डोहात बुडून १५ वर्षीय मुलीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. उन्हाळी सुट्टी आनंदात घालवण्यासाठी गावी आलेल्या कुटुंबांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्घटनेत लावण्या विजय पार्टे (१५, रा. साखरखेड), नितीन सूर्यकांत जाधव (३८) आणि विराज किशोर जाधव (१२, रा. गुहागर) यांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हे तिघे नागझरी नदीतील डोहात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते अचानक बुडू लागले. काही क्षणांतच आनंदाचा क्षण मृत्यूच्या थरारात बदलला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकाठावर धाव घेतली. जीवाच्या आकांताने सुरू झालेल्या मदतकार्यातून तिघांनाही बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच परिसरात एकच हंबरडा फोडला गेला.
या घटनेनंतर धामणंद गावासह संपूर्ण खेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलीसह तिघांचा मृत्यू झाल्याने वातावरण सुन्न झाले असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

दरम्यान, खेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. उन्हाळ्यात नदी, डोह आणि धरण परिसरात पोहताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3399572
Share This Article