लांजा: गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने पळणाऱ्या एका कंटेनरला लांजा पोलिसांच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्याच्या हद्दीतील कुवे येथे आज गुरुवारी दुपारी १२ वागण्याच्या सुमारास ही थरारक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एम एच १२ व्हीटी ७०४८ या क्रमांकाच्या एका कंटेनरने गोव्यातील पत्रादेवी येथे अपघात केला होता. अपघात केल्यांनतर चालक कंटेनरसह मुंबईच्या दिशेने वेगात पळून जात होता. या घटनेची माहिती गोव्याच्या मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी गुरुवारी सकाळी ११.४५ वागण्याच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्याला दिली. तसेच या कंटेनरचा माग काढत आमचे पोलीस कर्मचारी पाठीमागून येत असून, त्याला पकडण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी लांजा पोलिसांना केली.
गोव्याकडून मिळालेल्या या गोपनीय माहितीच्या आधारे लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि आपल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन सतर्क केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ११२ आपत्कालीन वाहनावरील पोलीस कॉन्स्टेबल आर्डे, चालक पोलीस कॉन्स्टेबल बजागे, वाहतूक पोलीस भुजबळराव, पोलीस कॉन्स्टेबल पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल नाईकवाडे यांचे पथक संशयित कंटेनरच्या शोधासाठी तात्काळ रवाना झाले.
महामार्गावर गस्त घालत असताना ११२ च्या गाडीतील पोलीस कॉन्स्टेबल आर्डे आणि चालक बजागे यांना कुवे गावाच्या हद्दीत सदर कंटेनर मुंबईच्या दिशेने जाताना दिसला. पोलिसांनी समयसूचकता दाखवत अत्यंत शिताफीने या कंटेनरचा पाठलाग केला आणि त्याला कुवे येथे यशस्वीरित्या रोखले. पोलिसांनी कंटेनरसह चालक अजीम खान (वय २५, रा. जाम पाखरी चौबे, पोस्ट जमता साई बस्ती, उत्तर प्रदेश; सध्या रा. मोहम्मद शमीन खान यांच्याकडे) याला ताब्यात घेऊन लांजा पोलीस ठाण्यात आणले.
या कारवाईनंतर काही वेळातच गोव्याच्या मोपा एअरपोर्ट पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल मिलिंद पोटे आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरे हे लांजा पोलीस ठाण्यात दाखल झाले. लांजा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संशयित आरोपी चालकाला आणि कंटेनरला गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले. अत्यंत तत्परतेने आणि कौशल्याने केलेल्या या कामगिरीबद्दल लांजा पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

