रत्नागिरी: जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांच्या शिष्यपरिवारातील तळवाडी (नाणीज, रत्नागिरी) येथील रहिवासी कै. श्रीम. मंजुळा वसंत तोडणकर (वय ९१ वर्षे) यांचे २० मे २०२६ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार २१ मे २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झालेले हे २० वे मरणोत्तर देहदान ठरले असून, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज संस्थान, नाणीज यांच्या माध्यमातून झालेले हे ५ वे देहदान आहे. कै. मंजुळा तोडणकर यांच्या पश्चात मुलगा वसंत तोडणकर आणि सून असा परिवार आहे.
देहदानाच्या वेळी महाविद्यालयात कै. तोडणकर यांचा मुलगा वसंत तोडणकर, त्यांची सून व इतर नातेवाईक उपस्थित होते. याप्रसंगी रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी संदीप नार्वेकर, मुन्ना साळवी, अनिता जाधव, पत्रकार राजन बोडेकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या सामाजिक कार्यात सागर भिंगारे, माणिक पाटील आणि नाणीज ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक शिवगण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये शरीररचनाशास्त्र विभागातील डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव, तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी आणि रुग्णवाहिका चालक पवन झोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तोडणकर कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठी मदत होणार असून, त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







