GRAMIN SEARCH BANNER

रुग्णालयात डॉक्टर नसल्याने सर्पदंश झालेल्या वृद्ध महिलेचा उपचाराअभावी मृत्यू; देवरुखमध्ये ग्रामस्थांचा तीव्र संताप

Gramin Varta
9 Views
A shot in the morgue

देवरुख: देवरुख ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका वृद्ध महिलेवर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. रुग्णालयात ऐनवेळी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने हा गंभीर प्रकार घडला असून, यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयात प्रचंड गोंधळ घालत तीव्र संताप व्यक्त केला. रुग्णालयातील तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांनी तात्काळ धाव घेत जमावाला शांत केले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे कुळये वाडी येथील रहिवासी असलेल्या अनुसया शिगवण (वय ८५) या रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घराजवळील लाकडाच्या खोपीतून लाकडे काढत होत्या. त्याचवेळी एका विषारी सर्पाने त्यांच्या हाताला दंश केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून त्यांना तात्काळ दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असणारे डॉक्टरच जागेवर उपस्थित नसल्याने या महिलेवर कोणतेही उपचार होऊ शकले नाहीत. ड्युटीवर असलेले डॉक्टर रुग्णालयात हजर न राहता भलत्याच कामात गर्क असल्याची चर्चा यावेळी उपस्थित ग्रामस्थांमध्ये सुरू होती.

महिलेची प्रकृती खालावत असल्याचे पाहून अखेर नुकतेच ड्युटी संपवून गेलेले डॉ. यादव रुग्णालयात परत दाखल झाले. त्यांनी तातडीने या वृद्ध महिलेची तपासणी सुरू केली, परंतु तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता आणि उपचारापूर्वीच त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयातच आरडाओरड सुरू केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जाधव आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात दाखल झाले. याच वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव यांनीही रुग्णालयात येत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थित डॉक्टरांची चांगलीच खरडपट्टी काढली. रुग्णालयात यापुढे २४ तास डॉक्टर हजर असलेच पाहिजेत, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यावर डॉ. यादव यांनी ग्रामस्थांना शांत करत, यापुढे सेवेत सदैव डॉक्टर उपस्थित राहतील आणि अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाही दिली. यानंतर सायंकाळी उशिरा मृत महिलेचे शवविच्छेदन करून रात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Total Visitor Counter

3483720
Share This Article