रत्नागिरी: केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड येथील ग्रामस्थांच्या माथी अणुऊर्जा प्रकल्प मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत याविरोधात पुर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आता एकत्र आले आहेत. पुर्णगडमध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊच द्यायचा नाही, असा ठाम निर्धार करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारने अदानी ग्रुप आणि रिलायन्स ग्रुपसोबत एक सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत बारसू, पुर्णगड आणि देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पुर्णगड येथे रिलायन्स ग्रुपचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच या संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर पुर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गावात येणारा अणुऊर्जा प्रकल्प हा मुख्य विषय चर्चेला ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. गावावर आलेले हे विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाचे संकट सर्वांनी एकत्र येत कोणत्याही परिस्थितीत परतवून लावण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला. सध्या पुर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीत आंबा-काजू, भात आणि अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते, तसेच मच्छीमारी हा या परिसरातील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय आहे. हा अणुऊर्जा प्रकल्प आल्यास येथील शेती, बाबायती आणि मच्छीमारी संपूर्णपणे उध्वस्त होणार आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध करण्याची तयारी या बैठकीत केली.
या बैठकीला किरण तोडणकर, शशिकांत म्हादये, ओंकार अभ्यंकर, संतोष कुरतडकर, मंगेश म्हादये, विनोद साळुंखे, अभिजीत डोंगरे, विजयकुमार शिंदे, अमृत पोकडे, अन्वर पेजे, तयब दर्वेश, सुहासिनी धानबा, नम्रता बिर्जे, उदयराज भाटकर आणि रामचंद्र आंबेरकर उपस्थित होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थांची ही बैठक झाल्यानंतर याविषयी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पावस विभागप्रमुख किरण तोडणकर यांनी सांगितले की, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ही बैठक झाली. यावेळी अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घ्यायची यावर जेव्हा सविस्तर चर्चा झाली, तेव्हा सर्वांनीच या प्रकल्पाला कडाडून विरोध करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला आहे.






