पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
राजापूर : तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एक धक्कादायक जबरी चोरीची घटना समोर आली आहे. शेतात जात असलेल्या एका ७२ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याच्या अंगावर अज्ञात चोरट्याने मसाला पावडर टाकून, त्यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे राजापूर आणि आडीवरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत गोपाळ नार्वेकर (वय ७२, रा. आडीवरे कोभे, ता. राजापूर) हे २५ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोभे येथून व्येत्ये जाणाऱ्या रस्त्याने आपल्या शेतात चालले होते. शेतातील रातांब्याची फळे सुकत घालण्यासाठी ते जात असताना, रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या कच्च्या रस्त्यावरील चढ चढताना त्यांना अचानक धाप लागली. त्यामुळे विश्रांतीसाठी ते तेथील एका वडाच्या झाडाखाली बसले होते. फिर्यादी नार्वेकर हे झाडाखाली बसलेले असतानाच, पाठीमागून एका अज्ञात इसमाने येत त्यांच्या अंगावर अचानक मसाला पावडर टाकली. काही समजण्याच्या आतच त्या चोरट्याने नार्वेकर यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपये किमतीची ३० ग्रॅम वजनाची उभट गोलाकार साखळी डिझाईनची सोन्याची चैन जबरीने हिसकावून घेतली. यानंतर हा चोरटा रस्त्यावर दबा धरून बसलेल्या आपल्या दुसऱ्या साथीदारासह मोटार सायकलवरून सुसाट वेगाने पळून गेला.
या धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेल्या फिर्यादींनी तात्काळ नाटे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा क्रमांक ६४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या जबरी चोरीच्या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि तपासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. या गुन्ह्याचा तपास नाटे पोलीस ठाण्यामार्फत अत्यंत वेगाने सुरू असून, पळून गेलेल्या अज्ञात दुचाकीस्वारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह (LCB) पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
याला साजेशी इमेज बनवून दे चांगला आकर्षक






