दापोली: तालुक्यातील खरवते येथील एक २६ वर्षीय तरुणाने कुंभवे येथील कोडजाई नदीच्या पात्रात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. कांचन गणेश फराटे (वय २६, रा. खरवते, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवार, २५ मे रोजी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली. मौजे कुंभवे येथील कोडजाई नदीच्या पाण्याच्या पात्रात ‘फणसाचा डोह’ नावाच्या ठिकाणी नदीकाठी असलेल्या फणसाच्या झाडामध्ये वड जातीच्या झाडाची पारंबी गुंतली होती. कांचन फराटे याने याच पारंबीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह या झाडाला लटकलेल्या अवस्थेत स्थानिक लोकांना दिसून आला.
या घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका बोलावून कांचन याला दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासल्यानंतर उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचे चुलते महादेव देवजी फराटे (रा. खरवते, ता. दापोली) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार दापोली पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (अकस्मात मृत्यू रजि. क्र. ४६/२०२६) नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.







