GRAMIN SEARCH BANNER

मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीने संगमेश्वर तालुक्यात भात पेरणीच्या कामांना वेग; बळीराजा शेतात मग्न

Gramin Varta
7 Views

संगमेश्वर: रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा कमालीचा सुखावला आहे. या पहिल्याच पावसाने गेले काही दिवस असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला असून हवेत छान गारवा निर्माण केला आहे. पावसाच्या या समाधानकारक आगमनानंतर संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी राजा मोठ्या उत्साहात शेतीच्या कामाला लागला असून, तालुक्यात पारंपरिक पद्धतीने भात पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. पाऊस पडताच शेतकऱ्यांनी धूळवाफेवरील तसेच ओल्या जमिनीतील भात पेरणीला सुरुवात केली असून तालुक्यात ठिकठिकाणी शेतकरी सहकुटुंब शेतात राबताना दिसत आहेत. सध्या ग्रामीण भागात ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा पारंपरिक पद्धतीने बैलजोडी घेऊन जमीन कसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी शेताची मशागत, झाप-पालापाचोळा गोळा करून शेतजमीन भाजणे म्हणजेच रापण करण्याची कामे आधीच आटोपून ठेवली होती. त्यानंतर केवळ एका चांगल्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली होती. अखेर मान्सूनपूर्व पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्यामुळे बियाणे जमिनीत रुजण्यासाठी हवा तसा चांगला ओलसरपणा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात उशीर न करता भात, नाचणी आणि वरी यांसारख्या पारंपरिक पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे चक्र बदलल्यामुळे शेतीचे नियोजन कोलमडले होते, मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसाने वेळेत आणि चांगली हजेरी लावल्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून पुढील काही दिवस पावसाचे हेच सातत्य राहिले, तर यंदा भाताचे पीक उत्तम येईल, अशी आशा संगमेश्वर येथील शेतकरी रघुनाथ कानाल यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सध्या मान्सूनपूर्व पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड करताना अधिकृत आणि दर्जेदार बियाण्यांचाच वापर करावा, जेणेकरून उगवण क्षमता चांगली राहील, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच पेरणी करताना योग्य अंतर राखण्याचा सल्लाही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या संगमेश्वरच्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतीपूरक आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले असून ‘काळ्या आईची’ सेवा करण्यात शेतकरी पूर्णपणे मग्न झाला आहे. आता वेळेत पेरणी आटोपून शेतकरी खऱ्याखुऱ्या मान्सूनच्या मुख्य धारेची चातकासारखी वाट पाहत आहेत.

Total Visitor Counter

3483537
Share This Article