GRAMIN SEARCH BANNER

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; ई-केवायसीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वाची घोषणा

Gramin Varta
587 Views

लातूर: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी राज्यभरात विविध चर्चा सुरू आहेत. अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये जमा झाले आहेत.

मात्र, काही महिलांना ई-केवायसी पूर्ण न केल्याने तसेच तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याचा पर्याय खुला करावा, अशी मागणी महिलांकडून सातत्याने होत होती. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच “ई-केवायसीची प्रक्रिया सुरू राहील” असे महत्त्वपूर्ण विधान केले होते.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील राजूर (अहमदपूर) येथे आयोजित सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली. ज्या महिलांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनाही संधी देण्यात येणार असून कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, तांत्रिक अडचणी दूर करून सर्व पात्र महिलांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या घोषणेमुळे लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

3483539
Share This Article