GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: शेतकऱ्यांना कॅनमधून पेट्रोल-डिझेल देण्याची मागणी

Gramin Varta
50 Views

राजापूर: शेतकऱ्यांना कॅनमधून पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप राजापूर तालुका पश्चिम मंडळाचे कोषाध्यक्ष विवेक सीताराम गुरव यांनी राजापूरच्या तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.

राजापूर तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेल टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली असून त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असताना शेतीकामांसाठी आवश्यक इंधन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी शेतीची कामे ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध पेट्रोलपंपांवर सध्या इंधनाचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पंपसेट, फवारणी यंत्रे तसेच शेतीसाठी लागणाऱ्या अन्य यंत्रसामग्रीसाठी पेट्रोल व डिझेलची तातडीची आवश्यकता असते. मात्र टंचाईमुळे शेतकऱ्यांना वेळेवर इंधन मिळत नसल्याने मशागत, नांगरणी, फवारणी आणि पेरणीपूर्व कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

निवेदनात विवेक गुरव यांनी नमूद केले आहे की, खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी असून याच काळात शेतीची सर्व पूर्वतयारी केली जाते. इंधनाअभावी शेतीची कामे रखडल्यास उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना प्राधान्याने पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून द्यावे.

तसेच संबंधित पेट्रोलपंप चालक व पुरवठा यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देऊन शेतकऱ्यांना कॅनमधून इंधन देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Total Visitor Counter

3447372
Share This Article