माणगाव: मुंबईतील विलेपार्ले येथून उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी घरोशीवाडी गावात आलेल्या १५ वर्षीय निधी उतेकर या चिमुरडीची तिच्याच ओळखीच्या एका विवाहित नराधमाने जंगलात नेऊन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुभम उतेकर (वय ३५) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो देखील मूळचा घरोशीवाडीचा असून सध्या विलेपार्ले येथेच राहत होता. विलेपार्ले येथील सेंट झेवियर्स शाळेत शिकणारी निधी सोमवारी रात्रीच्या सुमारास तिच्या वडिलांच्या मोबाईलवर बोलत-बोलत घराबाहेर पडली होती, मात्र त्यानंतर ती परतलीच नाही. बुधवारी तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह जंगलात आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. अंगावरील जखमांवरून ही हत्याच असल्याचा प्राथमिक अंदाज घेत माणगाव पोलिसांनी तत्परतेने फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण केले व तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून अवघ्या २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.
या थरारक गुन्ह्याचा तपास करताना मुलीच्या वडिलांचा मोबाईल पोलिसांसाठी तपासाचा मुख्य दुवा ठरला. निधीने घरातून बाहेर पडण्यापूर्वी शेवटचा कॉल शुभमलाच केला होता, ही माहिती तांत्रिक विश्लेषणातून समोर आली. निधी गावाला जाणार असल्याचे आरोपी शुभम याला आधीच ठाऊक होते, त्यामुळे तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने तो तिच्या पाठोपाठ मुंबईहून थेट घरोशीवाडीत पोहोचला होता. त्याने निधीला फोन करून घराबाहेर बोलावून घेतले आणि गावाजवळील घनदाट जंगलपट्ट्यात नेत तिची निघृण हत्या केली. या क्रूर कृत्यानंतर तो कोणालाही संशय येऊ नये म्हणून पुन्हा विलेपार्ल्याला पळून गेला होता.
माणगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चार तपास पथके तयार केली आणि संशयित शुभम उतेकरला मुंबईतून ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने निधीच्या हत्येची कबुली दिली आहे. आरोपी शुभम हा विवाहित असून, त्याने या १५ वर्षांच्या निष्पाप मुलीची एवढ्या क्रूरपणे हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली, याचा कसून तपास माणगाव पोलीस करत आहेत.





