पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता 24 वर पोहोचला आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
विकास किसन केदारी (60) आणि निलेश घोलप (45) अशी मृतांची नावे असून, हे दोघेही ससाणे नगर परिसरातील रहिवासी होते.
या नव्या मृत्यूंमुळे पुणे शहरातील मृतांची संख्या 24 वर पोहोचली असून फुगेवाडी, उरुळी कांचन आणि इतर भागांतही मृत्यूंची नोंद झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे. तपासासाठी सीआयडीची पाच विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, कर्तव्यात निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात भिवंडी कनेक्शनही समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भिवंडीतील एका गोदामावर छापा टाकून तब्बल 5,929 लिटर मिथेनॉल जप्त केले आहे. प्राथमिक तपासानुसार, पुण्यात तयार करण्यात आलेल्या विषारी दारूमध्ये याच मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी मोहीम राबवली आहे. या कारवाईत 4,480 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेले सुमारे 42 हजार लिटर घातक रसायन नष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत 52 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण भागातही अवैध हातभट्ट्यांवर कारवाई सुरू असून मुळशी तालुक्यातील विविध गावांमध्ये 10 ते 12 हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून नागपूर जिल्ह्यातही अवैध दारूविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील 43 ठिकाणी धाडी टाकून 56 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यातील या भीषण घटनेनंतर राज्यभर अवैध दारूविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला असला तरी, इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी का झाली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







