GRAMIN SEARCH BANNER

कुवारबाव येथे साडेतेरा हजारांचा प्रतिबंधित विमल पानमसाला जप्त, एकावर गुन्हा

Gramin Varta
248 Views

रत्नागिरी: शहरातील कुवारबाव मार्केट येथील एका जनरल स्टोअर्सवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला १३ हजार ५६७ रुपये किमतीचा विमल पानमसाला जप्त केला आहे. मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या या सुगंधीत पानमसाल्याची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी दुकानदाराविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर सदाशिव आटपाडकर (वय २७) यांच्या मार्गदर्शनाखाली कुवारबाव मार्केटमधील संबंधित जनरल स्टोअर्सवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान दुकानातून विमल पानमसाला केसरयुक्त आणि सुगंधीत तंबाखूचे एकूण ७१ मोठे पॅकेट्स आणि ९५ सुटे पाऊच असा एकूण १३,५६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा अन्नपदार्थ मानवी आरोग्यास अत्यंत घातक आणि प्रतिबंधित आहे हे माहीत असूनही, केवळ आर्थिक फायद्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याच्या उद्देशाने त्याची साठवणूक व विक्री केली जात असल्याचे कारवाईत स्पष्ट झाले.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राजेंद्र गोपाल कळंबटे (वय ५२, रा. रवींद्र नगर, कारवांची वाडी रोड, कुवारबाव, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ (पूर्वीचे भा.द.वि. कलम ३२८, १८८, २७२, २७३) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3451730
Share This Article