GRAMIN SEARCH BANNER

लंडनमध्ये कोकणचा डंका! दापोलीच्या नादिया रुमाणेला प्रतिष्ठेचा ‘आउटरीच ॲम्बेसेडर’ पुरस्कार

Gramin Varta
272 Views

दापोली: कोकणातील गुणवत्तेने जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला आहे. दापोली तालुक्यातील पंचनदी कोलथरे येथील मूळ रहिवासी आणि सध्या सौदी अरेबियातील अल खोबर येथे वास्तव्यास असणारे रियाझ रुमाणे आणि शफीका रुमाणे यांची कन्या नादिया रुमाणे हिला युनायटेड किंगडममधील (लंडन) नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरतर्फे अत्यंत प्रतिष्ठेचा ‘आउटरीच ॲम्बेसेडर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नादियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तिचे पालक, नातेवाईक आणि संपूर्ण कोकणवासीयांकडून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

या यशाची पार्श्वभूमी अशी की, रियाझ रुमाणे यांच्या नादा आणि नादिया या जुळ्या मुली युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरमधून ‘अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन’ या विषयात बीए (ऑनर्स) पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. या दोन्ही भगिनी शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उत्तम प्रगती करत असून बालशिक्षण, इन्क्लुसिव्ह एज्युकेशन आणि आधुनिक शिक्षण पद्धतींमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांची आई शफीका रुमाणे (मूळ रा. देसाई मोहल्ला, चिपळूण) या गेल्या १५ वर्षांपासून अल खोबर, दम्माम आणि बहरीन भागात नर्सरी आणि किंडरगार्टनचा यशस्वी व्यवसाय चालवत आहेत. आईच्या याच पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुली शैक्षणिक क्षेत्रात पुढे जात आहेत.

या कुटुंबाने नुकतीच अल खोबर येथे अमेरिकन अभ्यासक्रमावर आधारित आणि प्रगत शैक्षणिक सुविधा देणाऱ्या ‘नोव्हा इंटरनॅशनल स्कूल’ची स्थापना करून या क्षेत्रात एक मोठे पाऊल टाकले आहे.
उच्च शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात मोठे योगदान देण्याचा या दोन्ही बहिणींचा मानस आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नादिया ‘स्पेशल अँड इन्क्लुसिव्ह एज्युकेशन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण (मास्टर्स) घेणार असून, विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या मुलांच्या विकासासाठी काम करण्याचे तिचे ध्येय आहे. तर दुसरीकडे, नादा ही पदवीनंतर एज्युकेशनमध्येच मास्टर्स करणार असून आगामी पिढीसाठी उत्तम शैक्षणिक दर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रियाझ रुमाणे हे गेल्या २५ वर्षांपासून कुटुंबासह सौदी अरेबियात वास्तव्यास असून तेथील कोकणी समाजाच्या एकतेसाठी आणि कल्याणासाठी नेहमीच अग्रेसर असतात. मुलींच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल संपूर्ण आखाती देशांतील समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, रियाझ रुमाणे यांनी या प्रवासात दोन्ही मुलींना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत.

Total Visitor Counter

3485068
Share This Article