GRAMIN SEARCH BANNER

निधीअभावी रत्नागिरी जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’ची ८१९ कामे ठप्प; ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

Gramin Varta
58 Views

रत्नागिरी: केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘जलजीवन मिशन’ योजनेला रत्नागिरी जिल्ह्यात निधीअभावी मोठा ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात मंजूर झालेल्या एकूण १ हजार ४२८ पाणीपुरवठा योजनांपैकी तब्बल ८१९ योजनांची कामे गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहेत. थकबाकी न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदारांनी कामे बंद करून निधीसाठी आंदोलन पुकारले आहे, तर दुसरीकडे पाणी योजनांची कामे अर्धवट राहिल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी तीव्र वणवण भटकावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत नागरिक व जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत १ हजार १६७ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४२८ कामे हाती घेण्यात आली. प्रशासकीय आकडेवारीनुसार, यातील ५९३ कामे पूर्ण झाली असून त्यापैकी २५० हून अधिक योजना गावांकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. उर्वरित कामांपैकी ४४ योजनांची केवळ २५ टक्केच कामे झाली आहेत. तसेच १२२ योजनांची २५ ते ५० टक्के, ३०४ योजनांची ५० ते ७५ टक्के आणि ३४९ योजनांची ७५ ते १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. विविध गावांमध्ये पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम आणि घरगुती नळजोडणीची कामे वेगात सुरू असतानाच अचानक निधीचा ओघ आटल्याने या सर्वच कामांना ब्रेक लागला आहे.

सध्या ही रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्यासाठी १०० कोटींहून अधिक निधीची तातडीने गरज आहे. या निधीसाठी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असला, तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून याचा प्रभावीपणे पाठपुरावा होत नसल्याची टीका होत आहे. कोट्यवधी रुपयांची बिले रखडल्याने ठेकेदारांनी आर्थिक अडचण निर्माण झाल्याचे सांगत कामे अर्धवट टाकली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे योजना पूर्ण न झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या रखडलेल्या कामांमुळे आणि झालेल्या खर्चाच्या गोंधळामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सदस्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागण्याची आणि मोठा गदारोळ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Total Visitor Counter

3483539
Share This Article