लांजा: तालुक्यातील बेणी बुद्रुक येथील कुसुममळेवाडीमध्ये बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एका घरात घुसून बिबट्याने ५२ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातून अचानक झालेल्या हल्ल्यानंतर आरडाओरडा ऐकून मदतीसाठी धावलेल्या एका १९ वर्षीय युवकावरही बिबट्याने झडप घातल्याने तोही जखमी झाला आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र घबराट पसरली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बेणी बुद्रुक येथील कुसुममळेवाडीत बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्व काही शांत असताना, अचानक घराच्या पाठीमागील बाजूने एक बिबट्या घरात शिरला. काही समजण्याच्या आतच समोर आलेल्या बिबट्याने घरातील ५२ वर्षीय व्यक्तीवर थेट झडप घातली. बिबट्याने हल्ला करताच संबंधित व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. हा आवाज ऐकून शेजारी राहणारा १९ वर्षीय युवक तात्काळ त्यांच्या मदतीसाठी घराकडे धावला. मात्र, बिबट्याने त्या युवकावरही हल्ला चढवला. या दुहेरी हल्ल्यामध्ये दोघेही जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिबट्या थेट वस्तीत आणि त्यातही थेट घरात घुसून हल्ला करत असल्यामुळे कुसुममळेवाडीसह संपूर्ण बेणी बुद्रुक परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी घरात राहणेही आता असुरक्षित बनल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावून संबंधित बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.






