GRAMIN SEARCH BANNER

भंगार दुकानातून नंबर प्लेटविरहित दुचाकी जप्त; रत्नागिरी शहर पोलिसांची कारवाई

Gramin Varta
296 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिसांनी साळवी स्टॉप परिसरातील डंपिंग ग्राऊंडजवळील एका भंगार दुकानावर छापा टाकून नंबर प्लेट नसलेली संशयास्पद दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी भंगार व्यावसायिकाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिवराम शिंगवे हे ३ जून २०२६ रोजी शहर परिसरात नियमित पेट्रोलिंग करत होते. दुपारी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ते साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात पोहोचले असता तेथील एका भंगार दुकानाची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान दुकानात नंबर प्लेट नसलेली सिल्व्हर रंगाची अॅक्सेस दुचाकी आढळून आली. याबाबत दुकान चालक रियाज फारुख अफराज (वय २१, रा. स्टेट बँक कॉलनी, चर्मालय, रत्नागिरी) याच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र संबंधित दुचाकीची कोणतीही वैध कागदपत्रे त्याच्याकडे आढळून आली नाहीत. तसेच चौकशीदरम्यान त्याने समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची भूमिका घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांनी सुमारे ५ हजार रुपये किमतीची सिल्व्हर रंगाची अॅक्सेस दुचाकी ताब्यात घेतली आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा चेसिस क्रमांक MB8CF4CAAB8166444 असून इंजिन क्रमांक K486-527392 असा आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८०/२०२६ नुसार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3471862
Share This Article