GRAMIN SEARCH BANNER

दापोली : पर्यावरण दिनानिमित्त निवेदिता प्रतिष्ठानचा त्रिसूत्री कार्यक्रम सुरू

Gramin Varta
5 Views

दापोली: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण दिन ते शिक्षक दिन (५ जून ते ५ सप्टेंबर २०२६) त्रिसूत्री उपक्रम राबवायचे ठरविले आहे.

त्याचा प्रारंभ आज झाला. वृक्षलागवड, जलसंवर्धन आणि रत्नागिरी जिल्ह्याचा पक्षी महाधनेशाचे संवर्धनार्थ असे या त्रिसूत्रीचे स्वरूप आहे. जालगाव (ता. दापोली) येथे वृक्षलागवडीने या त्रिसूत्रीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक आणि निवेदिता प्रतिष्ठानचे सल्लागार रमेश जोशी, रघुवीर साटम, महेश्वरी विचारे, सुनील चव्हाण आणि डॉ. प्रशांत परांजपे उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्याचे हरित आच्छादन पन्नास टक्के इतके कमी झाले आहे. तसेच भूजल पातळीमध्येदेखील घसरण झाली आहे. वातावरण बदलाला सामोरे जाण्याकरिता हरित आच्छादन वाढविणे आणि जलसंवर्धन या गोष्टींची जाणीवजागृती आणि कृती कार्यक्रम करण्यासाठी निवेदिता प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. ग्रेट इंडियन हॉर्नबिल (महाधनेश) या पक्ष्याला जिल्ह्याचा पक्षी म्हणून (Flagship Species) म्हणून घोषित केले आहे. त्याच्या संवर्धनाची जागृती केली जाणार आहे. हॉर्नबिल पक्षी दीर्घकाळ जगणारा आणि मोठ्या प्रजातीचा पक्षी आहे. त्याच्या संवर्धनार्थ जंगल राखणे आवश्यक आहे हा पक्षी जुन्या, पुरातन वृक्षांच्या ढोलीमध्ये राहतो. ही झाडे विकासाच्या नावाखाली तोडली गेली तर त्या पक्ष्याचे वास्तव्य अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे. याकरिताच सर्वांनी नवीन झाडे जगवण्याबरोबरच जुन्या झाडांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे..

यावेळी डॉ. परांजपे म्हणाले, रोप लावताना एक रोप, दोन खड्डे या संकल्पनेनुसार लागवड करावी. एका खड्ड्यामध्ये रोपटे लावावे आणि दुसरा खड्डा पावसाचे पाणी जिरण्यासाठी मोकळा सोडून द्यावा. यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते

पुढील तीन महिन्यांमध्ये दापोली तालुक्यातील विविध ठिकाणी हा उपक्रम घेण्यात येणार असून, नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे आणि येणाऱ्या वातावरण बदलावा सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन डॉ. परांजपे यांनी केले आहे. मोहिमेत ज्या नागरिकांना वृक्ष लागवड करून जलसंवर्धन करायचे असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3483721
Share This Article